कै. विजय पांडुरंग काळसेकर, कला फोटो स्टुडीयोचे संस्थापक. फोटोग्राफी व्यवसायातील एक नावाजलेले रत्न
कणकवलीत तेली समाज संघटीत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात कै. बापू डिचोलकर, कै. वसंत आरोलकर व त्यांची पत्नी, श्री. बबन नेरकर, श्री. नंदकुमार आरोलकर व तेलीआळीतील समाज बांधवांना मोलाचे सहकार्य करणारे समाजसंघटक अशी त्यांची ख्याती होती. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९४८ रोजी झाला. बालपणापासूनच त्याना कला-किडा क्षेत्राची आवड होती. शालेय जिवनात उत्तम धावपटू व व्हॉलीबॉल पटू अशी ओळख त्यांनी निर्माण केली. अशा हरहुन्नरी काळसेकरांच्या दादाला १९६८ च्या कणकवलीतील ट्रक अपघातात अपंगत्वाला सामोरे जावे लागले. दोन्ही पायांनी अधु होऊनही दादा मनाने खचले नाहीत. ते फोटोग्राफी व्ययसायाकडे वळले. कणकवलीतील तत्कालीन गोसावी फोटोग्राफर यांच्या कडून आवश्यक व्यावसायीक ज्ञान प्राप्त करुन स्वतःचा कला फोटो स्टुडीयो सुरु केला. आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना सोबत घेऊन व्यवसायात उत्तम जम बसविला. आपले बंधू श्री. सुभाष, श्री. रमेश व श्री. दिलिप यांनाही या व्यवसायात घेऊन स्वतःच्या पायावर उभे केले. स्वतः अविवाहीत राहून कुटुंबासाठी आयुष्यभर काम करत राहीले. त्यानी कणकवलीत महामार्गावर भव्य अशी वास्तू निर्माण केली. के. विजय यांचे व्यावसायीक, सामाजिक व पारिवारीक जीवन त्यातून प्रतिबिंबीत होते. तेली ज्ञातीतील विविध उपक्रमात ते आवर्जुन उपस्थित असत. ते १ ऑक्टोबर २००८ रोजी स्वर्गवासी झाले. त्यांनी आपल्या सामाजिक व कौटुंबीक कामाने समाज बांधवांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले.